विचार फोडा, डोकी नाही !
विचार फोडा, डोकी नाही !
सुवर्णमध्य साधा !
परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी।
माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपु नका।।
आजकाल प्राथमिक शिक्षण वर्गात हिंदी भाषा सक्तीचा जो वादग्रस्त विषय उफाळतोय , त्याकडे दुर्लक्ष करू नका , नाहीतर हीच अभिजात भाषा फक्त कागदाच्या कपट्यापुरती मर्यादित राहायला वेळ लागणार नाही !
मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तीन भाषा शिकणे गरजेचे आहे, ज्यामध्ये एक मराठी सक्तीची आहेच पण तिसरी भाषा निवडण्याला पर्याय आहेत जसे की हिंदी, मल्याळम, कन्नड, तेलगू, तमिळ इ. (संस्कृतचा नामोल्लेख ही नाही) त्यात जर हिंदी सक्तीची केली तर त्यासाठी आपल्याकडे शिक्षक उपलब्ध आहेत ! मुद्दा काहीसा बरोबर आहे , पण मुळात आपण जसं धोरणातील कोणत्या एका नियमाकडे लक्ष देतोय तसंच दुसऱ्या कोणत्या नियमाकडे लक्ष देणे सुद्धा तितकंच महत्त्वाचं नाही का ?
NEP 2020 : Page 14 - Multilingualism and the power of language - 4.11 मधील उल्लेख खाली मांडतो. "Wherever possible, the medium of instruction until at least Grade 5, but preferably till Grade 8 and beyond, will be the home language/mother tongue/local language/regional language."
या मुद्द्यातील मातृभाषेला आपण अधोरेखित कधी करणार ? शिक्षणाचं माध्यम म्हणून मराठी सक्तीची कधी करणार ?
एक साधा विचार करा आजच्या काळात किती मोठ्या किंवा खाजगी शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांशी मराठीमध्ये संवाद साधतात ? किती असे विद्यार्थी आता शिकत आहेत जे अस्खलित मराठी वाचू शकतात , लिहू शकतात ? चला सोडा , गेलाबाजार किती अशी मराठी घरं आहेत जिथे प्राथमिक विद्यार्थ्यांसोबत पालक घरात पूर्ण मराठीमध्येच बोलतात ? 😄
मुलांना इंग्रजीची सवय लावण्यासाठी घरात इंग्रजीतून संवाद साधणं गरजेचं आहे अशी कारण सर्रास दिली जातात. जागतिक दर्जाची भाषा इंग्रजी म्हणून महत्त्वाची आहेच कारण नोकरीच्या मुलाखती कधी मातृभाषेत होणार नाहीत ! पण सुवर्णमध्य साधणं तितकंच गरजेचं आहे , कारण आपण कोणीही न मांडलेला विचार आपल्या मातृभाषेतून जितक्या लवकर उत्तमपणे आपण करू शकतो तितका तो दुसऱ्या भाषेत प्रगल्भतेने होत नाही !
आमचा बंड्या किंवा धोंड्या किती छान इंग्लिश बोलतो, यावर आजकाल अनेक पालक अक्कल पाजळतात , पण मग त्याच बंड्याला मराठीत मिळालेले मार्क बुडाखाली लपवण्याची वेळ का येते ?
अहो बीजाचाच दर्जा निकृष्ट आहे, तुम्ही पीक कुठून आणणार !!
राज्य सरकारने हे लक्षात घ्यावं की शिक्षणाचे माध्यम सक्तीने मराठीतच करणार असाल तरच तुम्हाला दुसऱ्या भाषा सक्तीने शिकवण्याचा अधिकार आहे, कारण आजकालचे प्राथमिक विद्यार्थी " अंधश्रद्धा , व्रतवैकल्य, विश्वंभर , त्रैलोक्य, इ." असे शब्द लिहिणं सोडा हो, नीट वाचू शकतील की नाही ह्यातही शंका आहे !
मुद्दा कोणताही असो टीका करणं सोपं असतं, उपाय शोधणं अवघड ! आपल्या मातृभाषेचा समाजात होणारा ह्रास जर थांबवायचा असेल तर सोपा पर्याय म्हणजे ती बोलावीच लागेल ! बोलून बोलून ती जगावी लागेल ! बाळासाहेबांचं 1994 च्या दसरा मेळाव्यातलं आक्रमक असं एक वाक्य होतं त्याचा संदर्भ येथे लागेल , "या तरुणांमध्ये जर देशाभिमान जर भिनवायचा नसेल तर मग कशामध्ये भिनवायचा, म्युन्सिपाल्टीच्या नळात ?"
यात सुद्धा अपवाद असूच शकतात , मराठी माध्यमात शिकलेली अनेक मुलं ही मराठीसह इंग्रजी आणि हिंदी सुद्धा छान शिकतात व बोलतात, तसेच अनेक इंग्रजी माध्यमात शिकलेली मुलं अस्खलित मराठी बोलतात ! त्यांच्यासह त्यांच्या पालकांचेही कौतुक जरूर , पण याचा अर्थ गाफील राहून चालणार नाही. ज्या मुलांना सध्या एक वाक्य पूर्ण मराठीतून बोलताना अन्यभाषि शब्दांच्या कुबड्या लावाव्या लागतात , त्यांच्या काळजात जर भाषभिमान भिनवायचा असेल तर असा हलगर्जीपणा करून भागणार नाही.
ही गोष्ट फक्त सरकारनेच नाहीतर सर्व मराठी विद्यार्थ्यांनी , पालकांनी , शिक्षकांनी लक्षात घेतली पाहिजे ! पण याचा अर्थ काचा फोडून , नुकसान करून उपाय सापडणार नाहीत.....
विचार फोडा, डोकी नाही !
धन्यवाद 🙏
गौरांग नेहा विश्वजीत मराठे
खाली आपण सर्व अभिप्राय वाचू शकता 👇